कचऱ्याबाबत जागरूकता का वाढली पाहिजे ?

 

एकीकडे हवामान बदलाचे भयानक स्वरूप आपण अनुभवत असताना त्याला कारणीभूत असणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक असलेल्या कचऱ्याबाबत आपण अजूनही उदासीन आहोत. 

आपण कधी विचार केला आहे की कचरा एकदा आपल्या घरातून निघून गेला की त्याचे काय होते? तो गूढपणे अदृश्य होत नाही. आपल्या घरातला कचरा आपल्या नजरेसमोरून गेला की आपली जबाबदारी संपली असा आपला समज झाला आहे.  त्या कचऱ्याचे पुढे काय होते, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते, त्यावर कोणत्या प्रक्रिया केल्या जातात याबद्दल फारसे काही माहित नसते.काही सामाजिक संस्था, स्वयंसेवक,विद्यार्थी कचऱ्याच्या समस्या हाताळण्यासाठी व कचऱ्याबाबतची जागरूकता वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. तरी देखील वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने हे जाणून घेणे गरजेचे आहे की आपल्या घरातून बाहेर पडलेल्या कचऱ्याचे पुढे काय होते.  

पूर्वी आपण बाजारातून वस्तू आणण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करायचो,त्यामुळे कचऱ्याची समस्या ही मर्यादित असायची. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीनुसार आपण थेट बाजारात न जाता ऑनलाइन खरेदी करतो. त्यामध्ये वस्तूपेक्षा जास्त हे त्याचे प्लास्टिकचे वेष्टन असते, त्यामुळे कचरा वाढत जातो. अशा प्रकारचा कचरा वाढत जाणे हे वास्तव आपण स्वीकारायला हवं आणि त्या कचऱ्याचे पुढे काय होते याबाबत समजून घ्यायला हवं.  या  कचऱ्यावर प्रक्रिया झाली तर त्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि कुठलाही कचरा एक कचरा नसून तो एक प्रकारचा स्रोत आहे आणि त्यापासून काहीतरी मूल्य जोडली जाऊ शकतात किंवा संपत्ती निर्माण होऊ शकते हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. पण हे कधी होऊ शकते ?  तर तो कचरा त्याच्या अवस्थेमध्ये योग्य  विलगीकरण केलं गेलं तरच.

 ओला कचरा जर ओला कचरा राहिला तर त्याच्यापासून बायोगॅस बनवू शकतो किंवा चांगल्या उत्तम प्रतीचे खत बनू शकते. सुका कचऱ्यामधील प्रत्येक भाग हा परत  वापरण्यासारखा आहे.  तो कागद,प्लास्टिक,धातू असेल किंवा काच असेल अशा प्रकारच्या वस्तूंचा पुन्हा वापर केला जातो. हेच जर दोन्ही प्रकारातील कचरा एकत्र झाला तर आपल्या कुठल्या कामाला येऊ शकत नाही.ओला कचरा मध्ये जर पेपर, प्लास्टिक बॅग गेली तर त्याचा पुढे बायोगॅस प्लांट किंवा खताच्या प्रकल्पात होणाऱ्या विघटन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि  ते सयंत्र बिघडू शकते. जिथे प्लास्टिकचा पुनर्वापर करायचा आहे त्या प्लास्टिक मध्ये काही प्रकारच्या अन्नपदार्थांचे तुकडे गेले असतील तर अशा प्लास्टिकची उपयुक्तता आपण गमावून बसतो.

ओला,सुका कचऱ्याबरोबरच घरामध्ये डायपर्स,सॅनिटरी पॅड, वापरलेले बँडेज,कापूस असा तयार होणारा कचरा असतो. हा जर वेगळ्या पद्दतीने जमा केला तर या कचऱ्याचे  पुनर्वापर होऊ शकेल व मूल्य वाढेल आणि हा सगळा कचरा कुठेही कचरा साठविण्याच्या ठिकाणी (लँडफिल) न जाता त्यावर पूर्णपणे प्रक्रिया केली जाईल आणि सगळी शहरे कचरा मुक्त होऊ शकतील. मात्र हे उपाय का अमलात आणले जात नाहीत?
 वैयक्तिक पातळीवर अजून पर्यंत कचऱ्याचं साधं शास्त्र आहे ते अजुन फारसं लोकांपर्यंत पोहोचले गेले नसावं किंवा या विषयाकडे अजूनही लोकांचे दुर्लक्ष होत आहे.  या कचऱ्याचे विलगीकरण न केल्यास कचऱ्याचे ढीग वाढत जातील.

कचऱ्यामध्ये आपोआप मिथेन वायू हा निर्माण होत असतो, त्यामुळे  कचऱ्याला आग लावायची गरज नसते. तापमान वाढलं तरीसुद्धा कचरा पेट घेऊ शकतो आणि पेटलेला कचरा विझवणे हे खूप कठीण काम आहे, कारण या कचऱ्यातील ढिगामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे डिग्री तापमान असते. त्यामुळे कितीही पाण्याचा वापर केला तरी पाण्याची वाफ 100 डिग्री सेंटीग्रेड होत जाते आणि खालच्या भागातील कचरा विझू शकत नाही.  जळलेला कचऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण करणारे वायू, खूप प्रमाणात उष्णता बाहेर पडते,  याचा परिणाम हा हवामान बदलाला कारणीभूत ठरतो.  

उन्हाळा वाढला किंवा पाऊस लांबला यासाठी  जागतिक पातळीवर वेगवेगळे घटक कारणीभूत असले तरी कचरा हा सुद्धा त्यामागील एक खूप मोठे कारण आहे.  ज्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने केली जात नाही, तिथे कचरा जाळला जातो अन्यथा नदीच्या किनाऱ्याजवळील गावे आहेत तो कचरा नदीमध्ये सोडला जातो.  नंतर हा कचरा धरणांमध्ये अडकतो आणि धरणामध्ये अडकलेला कचरा हा  पिण्याच्या पाण्यामध्ये,जनावरांच्या पाण्यामध्ये, शेतीमध्ये येतो आणि यानंतर तो परत शहरांमध्ये येतो आणि यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो.  कचरा ही अशी गोष्ट आहे जी  जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करतो आणि अत्यंत अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही प्रकारचे परिणाम करू शकते.वास्तविकता ही आहे की आपण  वेष्टण नसलेलं चॉकलेट खाऊ शकणार नाही, कप नसेल आईस्क्रीम आपण खाऊ शकणार नाही त्यामुळे कचरा हा निर्माण  होणारच आहे पण त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे ही आपली जबाबदारी आहे.कचरा केवळ  नजरेआड केला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही.

आपण तयार केलेल्या कचऱ्यापैकी 20 ते 25 टक्के कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते. खूप मोठ्या प्रमाणात अशास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. ज्यामध्ये तो जाळला जातो, पाण्यात फेकला जातो, समुद्रात फेकला जातो आणि तो नंतर परत त्याचे भयावह स्वरूप होऊन तो पुन्हा आपल्या कडेच येत आहे. हाच प्रकार थांबवायचा असेल कचऱ्याबद्दलची जागरूकता प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सुरुवातीपासून असावी. शाळेपासून याची सुरुवात झाली तर आपले शहर,गावच नव्हे तर संपूर्ण देश वाचवण्यासाठी मदत होईल.

मल्हार करवंदे 
मुख्य कामकाज अधिकारी 

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे