कचरा का जाळू नये ?
अनेक वेळा आपण असे बघतो की घरी काही ना काही
तरी काम चालू असते त्यातून काही प्रकारचा कचरा निर्माण होत असतो किंवा
इमारतीच्या परिसरात असलेल्या झाडांचा पालापाचोळा त्याची विल्हेवाट कशी
लावायची हे नागरिकांना माहीत नसते आणि एकंदरच जागरूकतेचा अभाव असल्यामुळे
जमा झालेला कचरा हा नागरिकांकडून जाळला जातो. कचऱ्याची योग्य,
शास्त्रशुद्ध विल्हेवाट कशी लावायची हा खूप महत्वाचा विषय आहे.जेव्हा कचरा
हा चांगल्या प्रकारे आदर्श पद्धतीने विलगीकरण केला जातो ओला, सुका किंवा
त्याच्या विविध स्वरूपाबाबत त्यावेळी त्यावर काही ना काही प्रक्रिया करता
येते आणि त्याचे काही ना काही तरी दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतर करून
त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. हे सगळे करण्यासाठी यंत्रणेची गरज असते.
ज्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध नसते अशा ठिकाणी किंवा जिथे लोकांमध्ये
जागरूकता नाही ,अशा ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची लोकांनीच शोधून
काढलेली सगळ्यात सोपी आणि हानिकारक पद्धत म्हणजे कचरा जाळून टाकणे.
कचरा
जाळला म्हणजे आपल्या नजरेआड जातो आणि त्याच्या नंतर त्या कचऱ्याचे काही
करावे लागत नाही, अशा विचारातून नागरिक या कचऱ्याची विल्हेवाट करत असतात.
पण कचऱ्यामध्ये ज्या काही गोष्टी जाळल्या जातात,त्यामध्ये पॉलिव्हर,
प्लास्टिक सारख्या हानिकारक घटकांचा समावेश असतो. हे घटक जाळल्यानंतर
त्यातून अत्यंत हानीकारक असे वायू बाहेर पडून उत्सर्जन होते, ही बाब
वातावरणासाठी व प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. पालापाचोळा,
भाजीचा कचरा किंवा गार्डन वेस्ट यापासून उत्तम प्रकारे खत तयार करता येते.
मात्र आपण या गोष्टी जाळून नुकसान करत आहोत. साधा कागद जरी झाला तरी
त्याच्यापासून प्रदूषण तयार होते. काही वेळा या कचऱ्यामध्ये अत्यंत
हानिकारक असे घटक पदार्थ असतात,ज्यात रबरी टायर, घरामधील ई-वेस्ट असते. या
ई-वेस्ट मध्ये पीव्हीसी (पॉलीव्हीनाईल क्लोराईड ) किंवा त्यातील धातू
हवेमध्ये मिसळून हवेसह भूजल व संपूर्ण वातावरणात प्रदूषण करणारे घटक
सापडतात. ज्या ठिकाणी कचरा जाळला जातो केवळ तिथेच सापडतो असे नाही, तर
शहरी भागात जाळला तरी या प्रकारच्या प्रदूषणकारी वस्तू आहेत किंवा जे
पदार्थ आहेत त्यांचे काही घटक हे सगळीकडे सापडतात. म्हणजे हे सर्वव्यापी
आहे आणि नंतर कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुन्हा आपल्याच पाण्यात किंवा
अन्ना मार्फत आपल्या शरीरात प्रवेश करून त्याचा खूप मोठ्या प्रमाणात धोका
होऊ शकतो. म्हणूनच कोणीही,कधीही कुठल्याही प्रकारचा कचरा जाळू नये आणि कचरा
विल्हेवाट करण्याची जी काही यंत्रणा आहे त्यांच्याकडे देणे गरजेचे आहे.
एका
नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वतः देखील जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्या
माध्यमातून हा विषय हाताळला पाहिजे. जर यंत्रणा कमी पडत असेल तर त्या
ठिकाणी कचरा जाळणे हा कधीच उपाय असू शकत नाही.पण पालापाचोळा प्रकारातील
कचरा जमा होत असेल, किंवा तुमच्याकडे बाग असेल तर बागेमध्ये छोटा खड्डा
करून त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकून घरगुती प्रमाणात चांगले खत नक्कीच
तयार करू शकतो.
जो कचरा निर्माण होतो आहे त्याची जागेवरच योग्य
पद्धतीने विल्हेवाट लावणे हाच योग्य मार्ग आहे, त्यामुळे यंत्रणेवर देखील
ताण येणार नाही आणि कचरा जाळण्यासारखी अशास्त्रीय गरज सुद्धा पडणार नाही.
मल्हार करवंदे
मुख्य कामकाज अधिकारी
अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह