‘परिवर्तनाची सुरवात स्वयंसुधारणेपासून होणे गरजेचे’
समाजातील कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात ही व्यक्तिगत
स्वतःपासूनच झाली पाहिजे. मानसिक स्वच्छता आणि इतरांप्रती आदर यातून पुढे
बाह्य स्वच्छताही साध्य होईल, असे प्रतिपादन ‘विश्वकल्याण गुरु सेवा
फाऊंडेशन’चे संचालक व प्रख्यात प्रेरक वक्ते विनायक छत्रे यांनी येथे केले.
शाश्वततेचे विविध पैलू आणि आपले शहर स्वच्छ आणि शाश्वत ठेवण्यासाठी या
पैलूंचे सामान्य माणसासाठी असलेले महत्व, याचा शोध घेण्यासाठी ‘अदर
पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह’तर्फे (एपीसीसीआय) नुकतेच 'क्लीन सिटी
टॉक्स' ही चर्चासत्रांची विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाची
सुरुवात श्री. छत्रे यांच्या ‘शाश्वतता आणि नेतृत्व’ या विषयावरील भाषणाने
झाली. याप्रसंगी ‘एपीसीसीआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर,
मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, आणि लीड व्हॉलेंटियर सत्या नटराजन
उपस्थित होते.
विनायक छत्रे हे एक प्रख्यात प्रेरक वक्ते असून
पुण्यात सिद्ध समाधी कार्यक्रम सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे,
तसेच शिक्षकांसाठी असलेल्या प्रशिक्षण उपक्रमातही ते सहभागी आहेत. ते
‘फोर्बाको सिस्टम्स अँड कॉम्प्युटर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड’चे
व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या भाषणात श्री.
छत्रे म्हणाले की, आपण गोष्टींकडे जसे पाहतो ते मार्गच बदलणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, जे लोक आपल्या घरातील कचरा गोळा करून घेऊन जातात, त्यांना आपण
कळत- नकळत 'कचरेवाला' असे म्हणतो, प्रत्यक्षात ही लोकं आपण निर्माण केलेला
कचरा साफ करणारे सफाई कर्मचारी असतात. ‘एपीसीसीआय’च्या प्रयत्नांचे कौतुक
करताना ते म्हणाले की या मोहिमेचे नाव 'क्लीन सिटी इनिशिएटिव्ह' आहे आणि
त्यामुळे संपूर्ण लक्ष स्वच्छतेवर केंद्रित आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे
काही करायचे आहे त्यामध्ये स्वच्छ मन आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे
आणि परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे.
कृष्णन कोमंडूर म्हणाले की, स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करून शहर अधिक राहण्यायोग्य बनवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
सत्या नटराजन म्हणाले की, 'क्लीन सिटी टॉक्स' मध्ये तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून शाश्वततेच्या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
‘एपीसीसीआय’चे
व्हॉलेंटियर व सहयोगी अमित जानोरीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर मल्हार करवंदे यांनी आभार मानले.