'माझी वारी स्वच्छ वारी' स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत , स्वयंसेवी संस्थांचा सत्कार
पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर 'माझी वारी स्वच्छ वारी' या स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायत , स्वयंसेवी संस्थां, तसेच पुणे महानगर पालिका, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या प्रतिनिधींचा एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला . अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे मांजरी रोड येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय सभागृहात सर्व सहभागी संस्थांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संथश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवस्थान, देहू चे अध्यक्ष ह.भ.प श्री. पुरषोत्तम मोरे महाराज यांसह पीएमसी च्या घनकचरा विभागातील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे , अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे, एपीसीसीआय चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे , एपीसीसीआय चे लिड व्हॉलेंटिअर सत्या नटराजन आणि संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे सुरू करण्यात आलेल्या माझी वारी स्वच्छ वारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर ते सासवड आणि यवत या दोन्ही मार्गांवर सुमारे 125 किमी रस्ता पालखी प्रस्थानानंतर अवघ्या काही तासांतच स्वच्छ करण्यात आला. या दरम्यान १३५० हून अधिक स्वयंसेवक,अनेक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या सांघिक कार्यामुळे ३० जून ते ते 4 जुलै या चार दिवसांच्या कालावधीत ८६.५ टन सुका कचरा गोळा करण्यात आला.
यासाठी अदर पुनावाला क्लीन सिटी बरोबरच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी,उरुळी कांचन, कदमवाक वस्ती, वडकी, सासवड, दिवे काळेवाडी, यवत येवडे येथील ग्रामपंचायत आणि पुणे महानगरपालिका, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यासह गावांमधील स्वयंसेवक यांच्या सांघिक कार्यातून पालखी मिरवणुकीच्या मार्गांवर काही तासांतच रस्ते स्वच्छ करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविली जाते.
यावर्षी स्वयंसेवकांना सहजरित्या कचरा गोळा करून ठेवता यावा यासाठी एपीसीसीआय तर्फे पालखी मार्गावर ग्रीन नेटस बसविण्यात आले. तसेच 140 हून अधिक कचरा वेचक वाहने आणि मशिन सेवेत कार्यरत होत्या. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह चे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे , कामकाज व्यवस्थापक निलेश रामेकर यांनी सर्व ग्रामपंचायत आणि स्वयंसेवकांमध्ये प्रत्यक्ष भेटी आणि व्हॉट्सॲपच्या मार्फत समन्वय साधण्याचे काम केले. स्वतंत्रपणे गोळा करण्यात आलेल्या सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पेपर कप इत्यादींचा समावेश होता. स्वयंसेवकांना प्लॉगिंग बॅगसह साफसफाईसाठी साहित्य देण्यात आले.
विविध सामाजिक व इतर संस्था हे या मेहिमेमध्ये दरवर्षी मोलाचे योगदान देत आहेत.यामध्ये बार्कलेज एलटीएस ग्रुप खराडी, संस्कृती ढोल पथक, उरळी कांचन एकता महिला बचत गट, एकात्मिक बाल विकास योजना गट, कृपा नर्सरी टीम, निसर्ग उपचार आश्रमाचे कर्मचारी, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था कर्मचारी,राष्ट्रीय सेवा योजना उरळी कांचन, गोविंदा महिला समूह,स्वामी सेवा परिवार ट्रस्ट सोरतापवाडी, कस्तुरी प्रतिष्ठान,कऱ्हामाई फाऊंडेशन, ब्रम्ह आश्र पब्लिसिटी, योद्धा करिअर अकादमी, संत सोपानकाका बँक पुणे जिल्हा फाऊंडेशन, जाणीव फाऊंडेशन, भूमाता महिला संघटना,ऋणानुबंध फाऊंडेशन,कर्मयोगिनी महिला ग्रुप हडपसर, एएसआर सर्व्हिसेस, सुमीत फॅसिलिटीज लि., शेवाळेवाडी ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप, राजे क्लब शेवाळेवाडी, उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान, ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन, सोरतापवाडी ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, जय हिंद ग्रुप, विद्या विकास कॉलेज यवत, नाझिरे कॉलेजमधील एनएसएस व एनसीसी टीम , सासवड, पर्यावरण संरक्षण समिती, ग्रामीण विकास विद्यालय कुंजीरवाडी, पुरोगामी विद्या विकास विद्यालय सोरतापवाडी, सुदर्शन युवा मंडळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे, सेवा सहयोग समिती यांचा समावेश आहे.
मागील पंधरा दिवसांपासून स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यासाठी या सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती तसेच सुमारे १३५० हून अधिक स्थानिक स्वयंसेवकांसह एपीसीसीआयच्या ३५० स्वयंसेवकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता. अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह मार्फत सर्व स्वयंसेवकांना कचरा संकलनासाठी पिशव्या, ग्लोव्हज् आणि वाहने पुरवण्यात आली.
हे अभियान अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.