पृथ्वीसमोरील तीन सर्वात मोठी आव्हाने आणि घरातील कचरा व्यवस्थापन

ट्रिपल प्लॅनेटरी क्रायसिस ही एक संयुक्त राष्ट्राने स्विकारलेली संज्ञा असून प्रदूषण,हवामानाचे संकट आणि जैवविविधतेचे नुकसान/पर्यावरणीय संकट या तीन परस्पर जोडले गेलेले पृथ्वीसमोरील सर्वांत मोठी आव्हाने दर्शविते.द युएन एनव्हायरमेंट प्रोग्राम (युएनईपी) आणि इंटरनॅशनल सायन्स कौन्सिल यांनी या विषयावर अहवाल तयार केले आहेत.एका नवीन अहवालानुसार जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांमुळे ही संकटे अधिक तीव्र होत चालली आहेत आणि याचे पृथ्वी आणि मानवी कल्याणावर मोठे परिणाम होऊ शकतात.

आजच्या काळातील पर्यावरणाशी संबंधित बहुतेक आव्हाने एकमेकांशी जोडलेली आहेत आणि याचा विपरीत परिणाम परिसंस्था,मानवी आरोग्य आणि अंतिमत: जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वततेवर होत आहे.यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक उपायांची गरज आहे.परंतु याचबरोबर आपल्यापैकी प्रत्येकाने योगदान देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

वैयक्तिक पातळीवर योगदान देताना हे तिहेरी संकट काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.हवामान बदल म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जन,जंगल तोड,कचऱ्यांचा वाढता ढीग इत्यादींमुळे वेगाने होणारी तापमान वाढ या सर्वांमुळे बर्फ वितळणे,तापमान वाढणे,हवामानातील तीव्र बदल याचा अनुभव आपल्याला येत आहे.जैवविविधतेचे नुकसान म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा सातत्याने व अनियंत्रित वापरामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास.यामुळे नैसर्गिक परिसंस्था,अन्न साखळी आणि अनेक प्रजाती नष्ट होत आहेत.तिहेरी संकटातील तिसरे संकट म्हणजे प्रदूषण.हवा,पाणी आणि माती प्रदूषणाच्या विविध स्वरूपात दिसत असलेल्या या समस्येला आपण रोज सामोरे जात आहोत.

वैयक्तिकरित्या आपण योगदान कसे देऊ शकतो ?
 
घरच्या घरी योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन अत्यंत प्रभावी ठरू शकते आणि सामूहिक प्रयत्नांनी एकत्रितपणे ही आव्हाने कमी करण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. छोटे, पण सातत्यपूर्ण प्रयत्न कार्बन उत्सर्जन कमी करू शकतात, उघड्यावरील कचरा (लँडफील) कमी करू शकतात आणि शाश्वततेला चालना मिळू शकते.  

काही सोपी पावले आपण सर्वजण आपल्या वैयक्तिक स्तरावर उचलू शकतो,ती खालीलप्रमाणे

1. घरामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुढील प्रक्रियेसाठी  योग्य विल्हेवाट सुनिश्चित करू शकतो.

2. स्वयंपाक घरातील शिल्लक अन्न पदार्थांपासून कंपोस्ट प्रक्रियेद्वारे खत तयार करू शकतो.

3. सक्षम आणि अधिकृत विल्हेवाट प्रणालीसह ई-कचरा, प्लॅस्टिक कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावता येईल जेणेकरून त्यांचा प्रभावीपणे पुनर्वापर किंवा दुरुस्ती करता येईल.

4. आपण किती कचरा निर्माण करतो, आपण खरेदी केलेली उत्पादने पर्यावरणपूरक आहेत का व शाश्वत पद्धतीने तयार केली आहेत का, आपण वापर कमी करू शकतो का, जुनी उत्पादने पुन्हा वापरू शकतो का, याबद्दल जागरूक होण्याची वेळ आली आहे.

5. स्वच्छता आणि शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांसोबत स्वच्छता अभियानात सहभागी होऊ शकतो

वैयक्तिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत आणि आपण सर्वांनी मिळून योगदान दिल्यास ही सामूहिक कृती प्रभावी ठरते. ट्रिपल प्लॅनेटरी क्रायसिसचा सामना करण्यासाठी सर्व स्तरांवर तातडीच्या प्रयत्नांची गरज आहे. शाश्वत जीवनाची सुरुवात ही जागरूक होऊन योग्य पर्याय निवडून होते आणि एकत्रितपणे आपण भावी पिढ्यांसाठी महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो.

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना