स्वच्छता सैनिक व नागरिकांमध्ये सहयोग असल्यास शहराची स्वछता राखण्यास मदत - लक्ष्मी नारायण
स्वच्छता सैनिक व नागरिकांमध्ये सहयोग आणि सहकार्य असेल तर
शहराची स्वच्छता राखण्यास मदत होते असे मत 'स्वच्छ' च्या सह - संस्थापिका
लक्ष्मी नारायण यांनी व्यक्त केले. अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह
(एपीसीसीआय) तर्फे नुकतेच क्लीन सिटी टॉक्सच्या तिसऱ्या सत्राचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी एपीसीसीआयच्या कार्यालयामध्ये त्यांनी स्वच्छता
सैनिकांशी संवाद साधला.
याप्रसंगी 'स्वच्छ' च्या सदस्या विद्या
नाईकनवरे, एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडूर, मुख्य
कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, लीड व्हॅलेंटीअर सत्या नटराजन यांसह
एपीसीसीआयचे कर्मचारी व स्वच्छता सैनिक उपस्थित होते.
क्लीन सिटी
टॉक्स हा एपीसीसीआयचा एक विशेष उपक्रम असून शाश्वतता आणि नेतृत्वाचे विविध
पैलू मान्यवरांकडून जाणून घेणे आणि त्याचा उपयोग आपले शहर स्वच्छ व शाश्वत
कसे ठेवता येईल हे समजून घेणे आहे.
'स्वच्छ'च्या प्रवासाबाबत
माहिती देताना लक्ष्मी नारायण यांनी सांगितले की, सुरुवातीला 'स्वच्छ'ची
१९८९ मध्ये अधिकृत नोंदणी झाली होती. त्यावेळी या संस्थेला कागद काच पत्र
कष्टकरी पंचायत ( कष्टकरी कचरा वेचकांचे ट्रेड युनियन ) अशी ओळख निर्माण
झाली. तेव्हा पासून आत्ताचे विकेंद्रीत व जबाबदार संस्थेपर्यंतच्या
प्रवासात तसेच या प्रवासातील आव्हाने आणि त्याला सामोरे जाऊन 'स्वच्छ' ही
संस्था आपला अविभाज्य भाग कसा बनला, या बाबत लक्ष्मी नारायण यांनी संवाद
साधला.
सुरुवातीला कचरा वेचकांना हे माहित नव्हते की ते समाजाप्रती
किती महत्वाचे काम करतात. त्यांना जेव्हा आम्ही विचारले तुम्ही काय काम
करता तर 'आम्ही काही काम करत नाही ' जगता कसे तर ' कचरा गोळा करून विकतो '
असे ते सांगायचे. या कामामुळे त्यांचे घर चालते, पोट भरते आणि मुलांना
शाळेत पाठवण्यासाठीची मदत होते, हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. याला
कामाचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही ट्रेड युनियन म्हणून नोंदणी केली.
आपले शहर स्वच्छ राखण्यासाठी नागरिक आणि कचरा वेचकांमध्ये सहकार्य वश्यक आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले .