कचरा वर्गीकरण या जागतिक आव्हानाकडे दुर्लक्ष नको

कचऱ्याच्या संदर्भामध्ये आपला एक नेहमी प्रश्न असा असतो की कचऱ्याचे करायचं काय ? ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा वापर संपतो किंवा ती वस्तू निरुपयोगी होते तेव्हा आपण त्याचा कचरा झाला असे म्हणतो. पण हाच कचरा किंवा अशाच निरुपयोगी वस्तू जर सुस्थितीत सांभाळल्या गेल्या, ठेवल्या,साठवलेल्या गेल्या तर दुसरे कोणते तरी उत्पादन बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरता येऊ शकतो.उदा.ओला कचरा वेगळा ठेवला गेला आणि तो प्रक्रिया प्रकल्पामध्ये गेल्यावर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत किंवा बायोगॅस तयार करता येऊ शकते. ओला कचऱ्यामध्ये प्लास्टिक,धातू,काच असे प्रकारचे न कुजणारे किंवा ज्याच्यापासून पुढचे उपपदार्थ तयार होत नाहीत असा कचरा मिसळला गेला तर प्रकल्पामध्ये कंपोस्ट खत किंवा बायोगॅस तयार होऊ शकत नाही. त्यामुळे प्रकल्प बंद पडतात व अपेक्षित असा परिणाम आपल्याला मिळत नाही आणि अपेक्षित अशा नवीन उत्पादनाची निर्मिती देखील होत नाही.तसेच प्लास्टिकचे सुद्धा आहे.प्लास्टिक कचरा हा एक विशिष्ट समस्या निर्माण करतो. प्लास्टिकचे वर्गीकरण किंवा विलगीकरण योग्य रीतीने केले तर प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याच्या भरपूर सोयी उपलब्ध होऊ शकतात. याच प्लास्टिकपासून पुन्हा नवीन उत्पादने निर्माण करता येऊ शकते किंवा इतर कामासाठी वापरले जाऊ शकते. प्लास्टिकचे योग्यरित्या वर्गीकरण केले तर ते कार्यक्षमतेने पुन्हा वापरले जाऊ शकते किंवा त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो.कचऱ्याचे प्रभावीपणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे आणि हे ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो अशाच ठिकाणी शक्य आहे.

कुठल्याही कचऱ्याचे वर्गीकरण हे कचरा जिथे निर्माण होतो अशाच ठिकाणी फक्त शक्य होऊ शकते. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण, विलगीकरण आणि साठवणूक की कचऱ्याच्या स्वरूपाप्रमाणे म्हणजे ओला कचरा - सुका कचरा अशी व्हायला हवी. सुका कचरा मध्ये सुद्धा कागद, प्लास्टिक,धातू, काच असे पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे.

 कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी ही कचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आहे. घर असो किंवा कार्यालय आपण एखाद्या वस्तूचा वापर करून ती वापरलेली वस्तू टाकून देतो आणि नंतर त्याचा कचरा तयार होतो. प्रत्येक नागरिकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की,आपला कचरा हा प्रक्रिया प्रकल्पांकडे पाठवण्याआधी त्याचे वर्गीकरण केले जाईल. कचऱ्याच्या स्वरुपात निर्माण होणारी वस्तूची साठवणूक ही वेगळ्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रकारच्या वस्तूच्या स्वरूपानुसार त्याला रंगाचे सांकेतांक दिलेले आहेत, त्याच पद्धतीने त्या त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू व्यवस्थित साठवणे आणि तिथून त्या कचरा प्रकल्पामध्ये नेणाऱ्या व्यवस्थेमध्ये देणे ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.कचरा निर्माण होणाऱ्या जागेवर योग्य वर्गीकरण केल्याशिवाय कोणताही कचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही.रस्त्यावर किंवा डंपिंग ग्राऊंडमध्ये कचरा साचणे हा अयोग्य वर्गीकरणाचा थेट परिणाम आहे.पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा कचऱ्यावर प्रक्रिया करून व कचरा दुसऱ्या स्वरूपामध्ये हस्तांतरित करण्यासाठी किंवा तो नष्ट करण्यासाठी प्रकल्प आहेत. या सगळ्या प्रकल्पांची एकच सगळ्यात मोठी समस्या ही आहे की हा कचरा पूर्णपणे विलगीकरण प्रक्रिया करून येत नाही, संपूर्ण कचरा एकत्रित येतो आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची परिणामकारक उपाय योजना कचऱ्यावर नीट होत नाही आणि कचऱ्यापासून अपेक्षित उत्पादन देखील आपण निर्माण करू शकत नाही आणि हाच कचरा खऱ्या अर्थाने निरुपयोगी बनतो.

सगळ्या प्रकारचा कचरा हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुन्हा वापरला जाऊ शकतो, मग तो घरातला असो किंवा बागेमधील पालापाचोळा असो किंवा ऑफिस मधून निर्माण होणारा कागदाचा कचरा असो या सगळ्या कचऱ्याचा पुन्हा वापर होणे शक्य आहे. फक्त त्यासाठी जिथे हा कचरा तयार होतो अशा ठिकाणीच त्याचे विलगीकरण आणि वर्गीकरण हे व्यवस्थित करणे अत्यंत गरजेचे आहे.

जागतिक पातळीवर हवामान बदलाचे तीव्र परिणाम आपल्या सर्वांनाच दिसून येतात. हे कमी करायचे असेल तर प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा ठरेल. आपण प्रत्येकाने याचा गांभीर्याने विचार केल्यास कचऱ्याची समस्या आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करून एक शाश्वत परिसंस्था तयार करू शकतो.  


मल्हार करवंदे
मुख्य कामकाज अधिकारी
अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय)

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

पहिल्यांदा स्वयंसेवा उपक्रमात सहभाग घेताना काही सूचना

पर्यावरणाच्या दृष्टीने सजग ग्राहक बना - अमिता देशपांडे