अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे नुकतेच स्वच्छता सैनिक मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 600 हून अधिक स्वच्छता सैनिक सहभागी झाले. हा मेळावा समर्पण, संघभावना आणि सामायिक ध्येयाच्या उत्सवाचे प्रतीक ठरला. हा कार्यक्रम वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून वानवडी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अमोल पवार उपस्थित होते . तसेच अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमंडूर, मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि सुमित फॅसिलिटीजचे संचालक सुनील कुंभारकर उपस्थित होते.
हे सर्व स्वच्छता सैनिक म्हणजे आपल्या शहरांना अधिक स्वच्छ आणि हरित ठेवणारी खरी प्रेरणा आहेत. आपल्या शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी दररोज पहाटेपासून ते रात्रीपर्यंत ते अथक परिश्रम करत असतात. अनेकदा पडद्यामागे काम करणारे हेच स्वच्छता सैनिक आपला रस्ता, उद्याने आणि सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेचे खरे अनामिक नायक आहेत.
हा मेळावा केवळ एकत्र येण्याचा नव्हता, तर या शहर स्वच्छ ठेवण्याच्या ध्येयाला चालना देणाऱ्या चिकाटी, आवड आणि एकत्रित कृतीतून शाश्वत बदल घडविण्याच्या विश्वासाची आठवण करून देणारा एक क्षण ठरला. यावेळी अनेक स्वच्छता सैनिकांनी मंचावर येऊन स्वतःचे अनुभव सांगितले आणि मनमोकळेपणाने व्यक्त झाले.
या सगळ्या गोष्टी ऐकताना एक गोष्ट स्पष्ट झाली - हे केवळ स्वच्छतेचे काम करणारे लोक नाहीत, तर एका समान ध्येयाने बांधलेले एक कुटुंब आहे.हा प्रवास पुढेही सुरू राहील - आणखी व्यापक परिणामांसह, समाजाशी अधिक घट्ट नाती जोडत, आणि सर्वांसाठी अधिक स्वच्छ, अधिक शाश्वत भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.