पर्यावरणाची काळजी म्हणजे आपल्या स्वत:ची काळजी

उत्पादन आणि संसाधनांचा वाढता वापर,कचऱ्याचे वाढते प्रमाण,योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाटाबाबत जागरूकतेचा अभाव आणि या सर्व गोष्टींमुळे जमीन,हवा आणि पाण्यामध्ये होणारे प्रदूषण हे आजच्या काळाचे वास्तव आहे.आपल्या पर्यावरणाचे आरोग्य ही आजची गंभीर समस्या असून आपल्या आरोग्यापासून ती वेगळी करता येणार नाही.खरंतरं 26 सप्टेंबर रोजी असणारा जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस पृथ्वीच्या आरोग्याशी आपले आरोग्य कसे जोडलेले आहे,हे अधोरेखित होते.


चुकीचे कचरा व्यवस्थापन ही पर्यावरणाच्या दृष्टीने आजच्या काळातील सर्वांत गंभीर समस्या आहे.कचऱ्याचे साठणारे ढीग,कचरा जाळण्याची समस्या,प्लास्टिकमुळे नदी व समुद्रामध्ये होणारे प्रदूषण या सर्व बाबींमुळे पर्यावरणाची कल्पनेपलीकडे हानी होत आहे.याचा परिणाम म्हणजे दूषित माती,प्रदूषित पाणी,हानीकारक वायू,विविध आजारांसाठी पोषक वातावरण असून याचा मानवी आरोग्यावर लक्षणीयरित्या परिणाम होत आहे.

उदाहरण घ्यायचे झाले तर,प्लास्टिकच्या अतिवापराने वन्य जीवनावर आणि आपल्या अन्न साखळीवर हानीकारक परिणाम होतो.त्याचे कारण प्लास्टिकचे विघटन व्हायला शेकडो वर्ष लागतात.असेच आणखी एक उदाहरण म्हणजे ई-कचरा,ज्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यास विविध परिसंस्थांना हानी पोहोचू शकते.

आपण व्यक्ती म्हणून काय करू शकतो ?

या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा उपायाचा भाग बनू शकतो.छोटी व शाश्वत पावले ही महत्त्वाची ठरू शकतात.अनावश्यक वापर कमी करणे,वस्तू टाकून देण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करणे,घरगुती कचरा वर्गीकृत करणे,सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे,स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करणे,पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रोत्साहित करणे या सगळ्या साध्या व सोप्या कृतींनी आपण यामध्ये मोठे योगदान देऊ शकतो.शेवटी आपले आरोग्य आपण सभोवतालच्या परिसंस्थेची काळजी कशी घेतो त्यावर अवलंबून असते.त्यामुळे या जागतिक पर्यावरण आरोग्य दिवसानिमित्त आपण सर्वजण आपल्या पृथ्वीच्या कल्याणासाठी योगदान देऊ ही प्रतिज्ञा करूयात !  

Popular posts from this blog

Become a conscious consumer- Ms.Amita Deshpande

Environmental Health: Safeguarding Our Future, Sustaining Our Planet

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व