पुण्यातील स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचंय? जाणून घ्या कसे सहभागी होता येईल!
90 च्या दशकापर्यंत पेन्शनर्सचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आज देशातील
सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांपासून
ते ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सपर्यंत, आयटी कंपन्यांपासून ते स्टार्टअप्स
आणि प्रगत होत जाणाऱ्या पायाभूत सुविधा - या सर्व गोष्टींमुळे पुणे
भारताच्या विकासाचे प्रतीक बनले आहे. मात्र झपाट्याने होणाऱ्या
शहरीकरणासोबत काही आव्हानेही येतात, आणि त्यामध्ये एक महत्त्वाचे आव्हान
म्हणजे विकासासोबत आपल्या शहराची स्वच्छता राखणे. शहरीकरणात वेगाने वाढणारा
ओला, सुका, प्लास्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक रूपातील कचरा आणि त्यातून
निर्माण होणारी आव्हाने याचा सामना कसा करतो ही केवळ स्थानिक सरकारची
जबाबदारी नसून आपल्या सर्वांची देखील आहे.
पुणेकर आणि
पर्यावरणप्रेमी आपल्या शहराच्या वारशाबद्दल जागरूक आहेत. शहरासाठी त्यांना
काही तरी करायचे असते, परंतु अनेकांना कुठून सुरूवात करायची हे माहीत नसतं!
खरं तर, शहरातील टेकड्या, वारसास्थळे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ
ठेवण्यासाठी सहभागी होण्याचे अनेक मार्ग आहेत.
ते खालीलप्रमाणे -
1. क्रॉनिक स्पॉट किंवा दीर्घकालीन कचरा साठलेल्या ठिकाणांची स्वच्छता मोहीम :
रस्ते, पूल, टेकड्या किंवा शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात, कुठेही कचऱ्याचे ढीग तयार होतात. या जागा अशा आहेत ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो. पुण्यात अनेक संस्था शनिवार-रविवारी नियमितपणे स्वच्छता उपक्रम राबवत असतात. अशा ठिकाणांना आपण एकत्रितपणे पुन्हा स्वच्छ आणि उपयुक्त बनवू शकतो.
2.नदीकाठ स्वच्छता मोहीम:
नद्या आपल्या जीवनवाहिनी आहेत, पण दुदैवाने शहरी प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम नद्यांना सहन करावा लागतो. अनेक संस्था आठवड्याच्या शेवटी प्लास्टिक आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबवतात.
3.वारसास्थळांजवळची स्वच्छता:
पुण्याचा वारसा म्हणजे अभिमान. वारसास्थळांच्या स्वच्छता मोहिमेचा उद्देश्य स्वच्छतेबद्दल आणि पर्यटनावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करताना या स्थळांचे सौंदर्य व प्रतिष्ठा जपणे आहे.
4. मॅरॅथॉन नंतरची स्वच्छता:
मॅरेथॉन हा नव्या काळातील लोकप्रिय होणारा उपक्रम आहे. मॅरेथॉन नंतर रस्ते किंवा परिसर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ शकता. फिटनेस, विरंगुळा आणि समाजसेवा या तिन्ही गोष्टी अनुभवण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणे म्हणजे फक्त स्वच्छता करणे नाही - तर एक आरोग्यदायी आणि अधिक जबाबदार समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. अशा स्वच्छता मोहिमा प्रदूषण कमी करण्यास, स्वच्छता सुधारण्यास आणि परिसराचे सौंदर्य वाढविण्यास मदत करतात. त्याचबरोबर, या उपक्रमांमुळे एकतेची भावना, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते. स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होऊन प्रत्येक व्यक्ती सामूहिक चळवळीत योगदान देऊ शकते.
पहिल्यांदाच स्वयंसेवक म्हणून काम करायचे असेल, तर छोट्या उपक्रमांनी सुरुवात करा,कारण प्रत्येक पाऊल महत्त्वाचे असते. स्थानिक स्वयंसेवी संस्था किंवा एनजीओंमध्ये सामील व्हा आणि त्यांच्या शनिवार-रविवारच्या उपक्रमांमध्ये भाग घ्या.
अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) मध्ये स्वयंसेवी उपक्रम हे आमच्या जागरूकता निर्माण करण्याच्या विविध उपक्रमांचा आधारस्तंभ आहेत. क्रॉनिक स्पॉटवरील स्वच्छता मोहिम ते सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता उपक्रम आणि सस्टेनेबल मॅरेथॉन पर्यंत यांद्वारे एपीसीसीआय विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांसोबत भागीदारी करते आणि स्वच्छता राखताना जागरूकता निर्माण करण्यास मदत करते.
जर तुम्हालाही या परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग व्हायचे असेल, तर leadv@adarpcleancity.com या ईमेलवर संपर्क साधा आणि सुरुवात करा!