स्वच्छता उपक्रमाच्या पद्धती नव्याने परिभाषित करणारी आजची तरुण पिढी
टेकडीवरील जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या आवडीतून इकोफोर्सचे संस्थापक ओजस पाठक या तरूणाने आपली स्वच्छतेच्या कार्याची वाटचाल सुरू केली. कचऱ्याच्या वाढत्या समस्येचे निराकरण केल्याशिवाय खरे संवर्धन अशक्य आहे,हे त्याला जाणवले. नैसर्गिक ठिकाणी सतत जमा होणारा कचरा ही एक अत्यंत गंभीर चिंतेची बाब बनली आहे. या समस्येसाठी केवळ विचार व दृष्टीकोन नव्हे तर प्रत्यक्ष कृती आवश्यक होती.
डिसेंबर 2024 मध्ये त्याने याबाबत स्वतंत्र अभ्यासाला सुरूवात केली.पुढील 13 महिन्यांत त्याने पर्यावरणीय समस्यांबरोबरच कचरा व्यवस्थापनामागील अर्थकारण आणि मानसशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला. फक्त स्वच्छता मोहिमांपुरता मर्यादित दृष्टीकोन न ठेवता कचरा वर्गीकरण,पुनर्वापर आणि शाश्वत प्रणाली बाबत अभ्यास केला. यामुळे स्वयंसेवी संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यापासून ते प्रत्यक्ष पातळीवर संरचित उपाययोजना राबवण्यापर्यंतचा एक स्पष्ट आणि कृतीयोग्य आराखडा तयार झाला.
त्याचा हाच दृष्टीकोन अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या 13 व्या सत्रात इतर उपस्थित तरुण स्वयंसेवकांच्या तोंडून ऐकायला मिळाला.या सत्रात टुगेदर इंडिया फाऊंडेशन, इकोफोर्स, क्लीनअप पुणे आणि मायप्रकृती या चार युवा नेतृत्व असलेल्या संस्था सहभागी झाल्या होत्या. या प्रत्येकाने स्वच्छ पुण्यासाठी केलेल्या आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांचे सादरीकरण केले.
राज चोक्सी यांना फ्रान्समधील वास्तवादरम्यान आलेल्या अनुभवातून प्रेरणा मिळाली,जिथे त्यांनी शिस्तबध्द कचरा व्यवस्थापनाची पध्दत जवळून पाहिली.स्वत: कृती करून इतरांसमोर आदर्श ठेवण्यासाठी आईने प्रोत्साहन दिले. भारतात परतल्यावर ही प्रेरणा घेऊन त्यांनी नव्या उद्देशाने काम सुरू केले.आज त्यांची संस्था टुगेदर इंडिया संपूर्ण शहरात नियमित स्वच्छता मोहिमा राबवत आहे.
त्याचप्रमाणे दिलीप शिंदे हे दीर्घकालीन शाश्वतेसाठी स्थानिक पातळीवर स्वच्छतादूत तयार करून स्वच्छता उपक्रमांचे विकेंद्रीकरण करण्याचे काम करत आहेत. मायप्रकृतीचे सह-संस्थापक आयुष जगताप हे टेकड्या,रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सातत्याने स्वच्छता मोहिमा आयोजित करून जनजागृतीला प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित करत आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये महत्त्वाचे म्हणजे विचारसरणीत दिसून येणारा बदल. आजची तरूणाई केवळ समस्या मांडत नाही,तर ते अभ्यासामध्ये वेळ गुंतवतात करतात, व्यवस्था समजून घेतात आणि व्यापक उपाय योजनांवर भर देतात.
बदल घडवून आणणाऱ्या या नव्या पिढीतील तरूण केवळ तक्रारी व समस्या मांडत नाहीत,तर ज्ञान,संवेदनशीलता आणि दृढनिश्चयाच्या जोरावर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडविण्यावर भर देत आहेत. तरुण पिढीने स्पष्ट दृष्टी आणि कटिबध्दतेसह पुढाकार घेतल्यास, शहरांमध्ये सुधारणा होण्याबरोबरच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकते,हा महत्त्वाचा संदेश या सर्वांच्या प्रवासातून दिसून येतो.
