उन्हाळा - स्वयंसेवी उपक्रमांसाठी सर्वोत्तम काळ
स्वयंसेवी संस्थांनी उन्हाळ्याच्या दिवसांचा सदुपयोग प्रभावीपणे करत प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सलग स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत. शनिवार-रविवारची सकाळच्या वेळेला समाजोपयोगी उपक्रमांचे स्वरूप प्राप्त झाले असून पुण्यात विविध गट नागरिकांना या मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेत आहेत. यावर्षी एपीसीसीआय ने मायप्रकृती,बीपीटी सेवा,टुगेदर इंडिया आणि क्लीनअप इंडिया यांसारख्या संस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
उन्हाळा
हा सहसा सुट्टया आणि निवातंपणाचा काळ मानला जातो,मात्र समाजासाठी काहीतरी
करण्यासाठी हाच सर्वांत प्रभावी रूतू ठरू शकतो. निरभ्र आकाशामुळे शहरातील
स्वच्छता मोहिमांसाठी हा उत्तम हंगाम मानला जातो. वेताळ टेकडी,तळजाई टेकडी
आणि बाणेर हिल्स सारख्या निसर्गरम्य ठिकाणांपासून ते मुळा-मुठा नदी
काठपर्यंत किंवा आपल्या परिसरातील रस्त्यांपर्यंत विविध ठिकाणी स्वच्छता
मोहिमा राबवल्या जात आहेत.
विशेषत: तरूण वर्ग या मोहिमेत उत्साहाने सहभागी होत आहेत.आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी घरात वेळ घालवण्याऐवजी अनेक युवक टेकड्या,नदीकाठ आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी पुढे येत आहेत. कचरा उचलण्याच्या एका साध्या कृतीतून सुरू झालेली ही मोहिम आता समाजाला प्रेरित करण्याच्या मोठ्या उद्दिष्टात बदलत आहे.ही केवळ कचरा हटविण्यापुरती मर्यादित बाब नसून लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आहे.
उन्हाळा अशा मोहिमांसाठी अनुकूल काळ असतो. कोरड्या हवामानामुळे कचरा गोळा करणे सुलभ होते आणि पावसाळ्यापूर्वी शहराची तयारी करण्यास मदत होते.यामुळे नाले तुंबणे आणि प्रदूषण वाढणे अशा समस्या टाळता येतात.वेताळ टेकडी सारख्या लोकप्रिय हरित परिसरांपासून ते मुळा-मुठा नदी काठापर्यंत स्वयंसेवकांचे काम लक्षणीय सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मोहिमांमुळे नागरिकांमध्ये कचरा रस्त्यावर न टाकणे आणि कचरापेटीचा जबाबदारीने वापर करणे या साध्या व दैनंदिन पण महत्त्वाच्या सवयी रूजत आहेत. स्वच्छता ही एक दिवसाची कृती नसून प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.या उन्हाळी मोहिमांमधून पुण्यात नागरिक शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच शहराची जपणूक करण्याची संस्कृतीही निर्माण करत आहेत.
तुम्हाला जर स्वयंसेवक म्हणून काम करायचे असेल तर . . .
अगदी साध्या पध्दतीने सुरूवात करणे शक्य आहे.कचरा व्यवस्थापन किंवा पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या स्थानिक स्वयंसेवी संस्था किंवा नागरिक गट शोधा. पुण्यात अनेक संस्था नियमितपणे स्वच्छता मोहिम आणि जनजागृती उपक्रम आयोजित करतात.आठवड्यातील केवळ काही तास दिले तरी त्यातून महत्त्वपूर्ण बदल घडू शकतो.
स्वच्छ परिसर निर्माण करण्याबरोबरच स्वयंसेवा ही नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना वाढवते. समान विचारांच्या लोकांशी जोडते आणि आपल्या शहराबद्दल अभिमान निर्माण करते.स्वच्छ जागा केवळ सौंदर्यासाठी महत्त्वाच्या नसून त्या आरोग्य,जैवविविधता आणि एकूण जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहेत.