आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे : निसर्ग संवर्धनाची सुरुवात आपल्या घरापासून
दरवर्षी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपल्याला याची जाणीव करून देतो की निसर्ग हा आपल्या जीवनापासून वेगळा नाही, खरंतरं तो आपल्या अस्तित्वासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सुपीक माती, जंगल, नद्या, पक्षी, कीटक आणि वन्यजीव हे सर्व मिळून मानवाच्या जीवनाला आधार देणारे संतुलित वातावरण निर्माण करतात. मात्र वाढते प्रदूषण आणि अयोग्य कचरा व्यवस्थापनामुळे ही जैवविविधता गंभीररित्या धोक्यात आली आहे.
पर्यावरणाच्या
हानीस कारणीभूत ठरणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे वाढणारा कचरा. रस्ते,
टेकड्या आणि नदी काठावर फेकला जाणारा प्लास्टिक कचरा अखेरीस जलाशय आणि
नैसर्गिक अधिवासांमध्ये पोहोचतो, ज्यामुळे प्राणी, पक्षी आणि जलचर जीवांना
मोठा धोका निर्माण होतो. कचरा जाळणे
किंवा रस्त्यावर टाकणे यामुळे माती आणि हवेचे प्रदूषण वाढते. ज्यामुळे शहरे
आणि गावे या दोन्ही परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो.
यातील सकारात्मक बाब म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण करण्याची सुरूवात आपल्या स्वतःच्या घरापासून सुरू होऊ शकते. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील कचऱ्याचे खत तयार करणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि जबाबदारीने पुनर्वापर करणे अशा साध्या सवयी मोठा बदल घडवू शकतात. कचरा व्यवस्थापन ही केवळ नागरी जबाबदारी नसून भविष्यातील पिढ्यांप्रती असलेली पर्यावरणीय बांधिलकी आहे.
पुण्यात अनेक संस्था आणि स्वयंसेवक आठवड्यातील शनिवारी-रविवारी टेकड्या, नद्या आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवून आदर्श निर्माण करत आहेत. वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, बाणेर टेकडी आणि नदी काठच्या परिसरात स्वयंसेवक नियमितपणे स्वच्छता उपक्रमात सहभागी होतात. अशा सामूहिक प्रयत्नांमुळे पुण्याचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यास आणि स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मदत होईल.
या आंतरराष्ट्रीय
जैवविविधता दिनानिमित्त आपण हे लक्षात ठेवूया की प्रत्येक लहान कृती
महत्त्वाची असते. स्वच्छ घरे स्वच्छ शहरांची निर्मिती करतात आणि स्वच्छ
शहरे सर्व सजीवांसाठी अधिक निरोगी वातावरण घडवण्यास मदत करतात.
