जागतिक पर्यावरण दिन : कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने उचलावीत अशी वास्तविक पावले
जागतिक पर्यावरण दिन : कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने उचलावीत अशी वास्तविक पावले
भारतातील पर्यावरणीय आव्हाने दिवसेंदिवस अधिक स्पष्टपणे दिसू लागली आहेत. दीर्घकाळ राहणाऱ्या उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई, शहरी पूरस्थिती आणि वाढते प्रदूषण यांमुळे हवामान बदलाचे परिणाम आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. या आव्हानाबरोबरच देशाला वाढत्या कचऱ्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे,ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि मिश्र झालेला कचरा, नद्या आणि सार्वजनिक ठिकाणी जमा होत असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत.धोरणात्मक बदल आणि मोठ्या प्रमाणावरील उपाययोजना आवश्यक असल्या तरी,अर्थपूर्ण बदलाची सुरूवात प्रत्येक व्यक्तीपासूनच होते.लाखो नागरिकांनी सातत्याने काही सोप्या कृती,सवयी अंगीकारल्यास पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पडू शकतो.
कचरा साठण्याच्या जागीच वर्गीकरण करा
ओला कचरा, सुका कचरा आणि सांडपाण्यातील कचरा वेगळा करणे हे प्रत्येक कुटुंबासाठी सर्वात प्रभावी योगदान असू शकते. योग्य वर्गीकरणामुळे पुनर्वापराचे प्रमाण वाढते, मोकळ्या जागेवरील कचऱ्याचा भार कमी होतो आणि कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनते.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करा
प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कप आणि कटलरी यांसारख्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळल्यास निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्याऐवजी पुन्हा वापरता येतील अशा वस्तूंचा वापर करण्याची सवय पर्यावरणासाठी दररोज फायदेशीर ठरते.
स्वयंपाक घरात जमा होणाऱ्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करा
घरगुती कचऱ्याचा मोठा भाग हा अन्नाचे उरलेले तुकडे आणि स्वयंपाक घरातील कचऱ्याचा असतो. हा कचरा घरी किंवा सामुदायिक स्तरावर कंपोस्ट केल्यास मोकळ्या जागेत जाणारा कचरा कमी होतो आणि झाडे व बागांसाठी नैसर्गिक खत तयार होते.
स्थानिक स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी व्हा
पुणे शहरात सर्व ठिकाणी स्वयंसेवक सार्वजनिक ठिकाणे, नदीकाठ, उद्याने आणि टेकड्यांवर नियमित स्वच्छता मोहिमा राबवत असतात. अशा उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने कचरा कमी करण्यास मदत होण्याबरोबरच, जबाबदार कचरा व्यवस्थापनाबाबत समाजात जनजागृती निर्माण होऊ शकते.
जबाबदारीने वापर करा
गरज असेल तेवढ्याच वस्तू खरेदी करणे, कमी पॅकेजिंग असलेल्या वस्तूंना प्राधान्य देणे, वस्तू फेकून न देता दुरुस्त करून वापरणे आणि शक्य तिथे वस्तूंचा पुनर्वापर करणे यामुळे कचऱ्याची निर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांवरील वापर लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.
जागतिक पर्यावरण दिन हा स्वच्छ आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी आपण प्रत्येकजण कोणती भूमिका बजावू शकतो याचा विचार करण्याची ही सुवर्णसंधी आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच अद्वितीय प्रयत्न करण्याची गरज असतेच असे नाही,तर कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे, स्वयंपाक घरातील कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे या वास्तविक व सहजरित्या केल्या जाऊ शकणाऱ्या उपाययोजनांमुळे देखील मोठा हातभार लागू शकतो. अशाच प्रकारची कृती सर्व नागरिकांनी एकत्रितपणे केली तर भारतासमोरील पर्यावरणीय आणि कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी मोठी मदत होऊ शकते.