लोकसभागाची ताकद दर्शवणारा स्वच्छता उपक्रम

झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था,वेगाने होणारा विकास,वाढते शहरीकरण,वस्तू आणि सेवांचा वाढणारा वापर यामुळे सर्वात भेडसावणाऱ्या प्रश्नांपैकी प्रमुख म्हणजे वाढणारा कचरा.या समस्येची व्याप्ती इतकी वाढत चालली आहे की,फक्त प्रशासनच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने सक्रीय होण्याची वेळ आली आहे.याबाबत बहुतांश लोकांना जागरूकता नसते,कारण आपल्या नजरेसमोरून कचरा गेला की त्याचे काय होते हे आपल्याला माहित नसते.बाहेर साचणारा कचरा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे विपरीत परिणाम आपण भोगत असलो तरी याबाबत पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहचली नाहीये. 

परंतु प्रत्येक नागरिकाने सजग होऊन छोट्या कृतीतून जर सुरूवात केली तर इतरांमध्येही जागरूकता निर्माण होऊन त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो आणि त्यामध्ये परिसरातील सर्व नागरिक सहभागी झाले तर त्याची व्याप्ती आणखी वाढू शकते. याचाच प्रत्यय सध्या आयडीयल कॉलनीमध्ये येत आहे.अशाच एक जागरूक नागरिक म्हणजे प्रज्ञा शेठ.त्यांनी ओल्या कचऱ्यापासून सुरूवात केली आणि थोड्या दिवसातच स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या संपूर्ण ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतामध्ये होऊ लागले.त्यानंतर त्यांनी आपले लक्ष सुक्या कचऱ्याकडे वळवले. सुक्या कचऱ्यात विशेष करून प्लास्टिकचा भार हा सर्वात जास्त असतो,हे त्यांच्या लक्षात आले.याचे कारण वस्तू आणि सेवांचा वापर जसा वाढत आहे,तसेच पॅकेज्ड वस्तू घरी येण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.यामध्ये बॉक्सेस आणि प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो.प्लास्टिकचा निचरा त्यांनी योग्य मार्गाने करण्यासाठी सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक विलगीकरण करण्यास सुरूवात केली.त्यातून त्यांना हे जाणवले की,घरातून बाहेर जाणारा सुमारे 70 टक्के कचरा हा कमी झाला आहे.आपण विलगीकरण केलेला कचरा हा योग्य ठिकाणी जातोय व त्याचा फेरवापर होतोय याची खात्री पटल्यानंतर बिल्डिंगमधल्या काही समविचारी लोकांनी त्यांना सांगायला सुरूवात केली.हळूहळू याचा प्रसार होत गेला व कालांतराने 32 फ्लॅटसची आख्खी सोसायटी या उपक्रमात सहभागी झाली.


आयडीयल कॉलनीच्या समिती सदस्यांना ही बाब कळल्यावर सोसायटीत राहणाऱ्या एका समिती सदस्याने हा उपक्रम आपण संपूर्ण आयडीयल कॉलनीत राबवू अशी कल्पना मांडली.या सर्वांनी हे करण्यास प्रोत्साहन दिले.अशा व्याप्तीने हे राबवण्यास आव्हानात्मक असले तरी सर्व जणांनी एकत्र येऊन नियोजनबध्द काम सुरू केले आहे.आयडीयल कॉलनीमधील 70 सोसायट्यांपैकी 37 हे या प्लास्टिक विलगीकरणामध्ये सहभागी झाले असून इतरांपर्यंत देखील पोहचण्याचा प्रयत्न होत आहे.


प्रज्ञा शेठ यांच्या मते, अनेक लोकांना पर्यावरणासाठी योगदान देण्याची ईच्छा असते,परंतु कशा पध्दतीने करायचे याची जागरूकता नसते. मात्र जागरूकता निर्माण झाल्यास लोकं आनंदाने यात सहभागी होतात. आता आमचे पुढचे उद्दिष्ट हे आयडीयल कॉलनी प्लास्टिकमुक्त करणे हे असून त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

प्रज्ञा शेठ यांनी सुक्या कचऱ्यासंदर्भात फक्त प्लास्टिकच नव्हे तर धातूच्या वस्तू,ई-वेस्ट,बॉक्सेस,रद्दी हा सध्याच्या काळात वाढणारा कचरा याचे पण विलगीकरण सुरू केले.त्याचबरोबर एक वेळ वापरल्या जाणाऱ्या वस्तू (वन टाईम डिस्पोजेबल) देखील वापरणे बंद केले.स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये रसायने समाविष्ट असतात आणि अंतिमत: ते नदीत जाऊन मिळतात.म्हणूनच त्यांनी बायो एन्झाईमचा वापर सुरू केला आणि स्वच्छतेसाठी रसायनमुक्त पदार्थ त्या गेली दहा वर्षे वापरत आहेत.

हा सर्व प्रवास प्रज्ञा शेठ यांनी अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) तर्फे आयोजित क्लीन सिटी टॉक्सच्या 14 व्या सत्रात एका विशेष सादरीकरणाने मांडला.याप्रसंगी त्यांनी एपीसीसीआयचे स्वच्छता सैनिक,सुपरवायझर आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमाला एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडुर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे,सरव्यवस्थापक आशिष मराठे आणि लीड वॉलेंटियर सत्या नटराजन उपस्थित होते.

Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

Inspiring Collaboration for a Greener Tomorrow