जागतिक स्वच्छता दिन 2026 : पुण्यातील वाढते स्वयंसेवी उपक्रम दिशादर्शक
पुणे हे भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहराच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे एका बाजूला नव्या संधी निर्माण होत असल्या, तरी दुसऱ्या बाजूला कचरा व्यवस्थापन यंत्रणा आणि सार्वजनिक जागांच्या स्वच्छतेवर वाढता ताणही निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हा केवळ सौंदर्याचा विषय राहिलेला नाही, तर अधिक निरोगी, शाश्वत आणि राहण्यायोग्य पुणे घडविण्यासाठी अत्यावश्यक आहे. यामुळे जबाबदार कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने शहराच्या वाटचालीत समुदायाच्या नेतृत्वाखाली राबविले जाणारे स्वच्छता उपक्रम अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहेत.
जागतिक स्वच्छता दिन 2026 (20 सप्टेंबर) च्या निमित्ताने पुणे हे नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल कसा घडवून आणता येतो, याचे प्रभावी उदाहरण ठरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये स्वयंसेवक आणि समुदाय समूहांची संख्या वाढत असून, हे नागरिक आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊन परिसर, सार्वजनिक ठिकाणे, नदीकाठ आणि कचरा साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करत आहेत. यातील अनेक स्वयंसेवक महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील तरुण व्यावसायिक आहेत. आठवड्याचा शेवट केवळ वैयक्तिक वेळ घालवण्यासाठी न वापरता हे तरुण नागरिक म्हणून आपली जबाबदारी स्वीकारत आहेत. पुण्यातील विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत ते सुट्टीच्या दिवसांकडे पाहण्याची एक नवी सकारात्मक दृष्टी निर्माण करत आहेत.हे स्वच्छता उपक्रम केवळ कचरा गोळा करण्यापुरते मर्यादित नाहीत. त्यातून जबाबदार कचरा व्यवस्थापनाबाबत जागृती होते आणि आपल्या हातातून निघालेल्या कचऱ्याचे पुढे काय होते, याचा विचार करण्यास नागरिकांना प्रवृत्त केले जाते. जेव्हा स्वयंसेवी गट एखाद्या परिसराच्या स्वच्छतेसाठी एकत्र येतो, तेव्हा कचरा कमी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकणे आणि सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा सुरू होते.
अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) स्वयंसेवी समूहांच्या प्रयत्नांना पाठबळ देत असून, स्वच्छता उपक्रमांना सक्षम करणे, जनजागृतीला प्रोत्साहन देणे आणि प्रत्यक्ष स्तरावर कृतीला चालना देणे यासाठी काम करत आहे. अशा सहकार्यामुळे नागरिकांमधील उत्साहाला एकत्रित प्रयत्नांची दिशा मिळते आणि त्यातून शहरात प्रत्यक्ष तसेच दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य होते.
जनजागृतीला कृतीची जोड मिळाली तर बदल नक्कीच घडू शकतो. प्रत्येक स्वच्छता मोहीम ही प्रत्येक नागरिक, प्रत्येक परिसर आणि प्रत्येकसमुदायाला आपल्या आजूबाजूच्या परिसराची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रेरणा देऊ शकते.
शहराला अजून स्वच्छतेबाबत बराच पल्ला गाठायचा असला तरी पुण्यातील स्वयंसेवक आणि स्वयंसेवी समुदाय योग्य दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांच्या एकत्रितप्रयत्नांमधून अधिक स्वच्छ, सुंदर आणि राहण्यायोग्य पुण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
फोटो: नदीकाठच्या परिसरात माय प्रकृतीचे स्वयंसेवक सुका कचरा गोळा करताना.
