चांगली जीवनशैली हीच आरोग्याची गुरूकिल्ली हा संदेश देणारा आरोग्य संवाद
स्वच्छ, निरोगी आणि अधिक सक्षम शहरे उभारण्यासाठी स्वच्छता सेवकांचे आरोग्य आणि कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करत, अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ने नुकतेच आरोग्य सेवा संचालनालय आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने आरोग्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात सुमारे 650 स्वच्छता सेवक ,सुपरवायझर्स आणि कर्मचारी सहभागी झाले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या सत्रामध्ये दैनंदिन जीवनात आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य जीवनशैली, समतोल आहार, नियमित शारीरिक हालचाल, वजन नियंत्रण, चुकीच्या सवयींपासून दूर राहणे तसेच मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक नातेसंबंध यांना तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे,हा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला. सहभागींना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एकूणच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या राज्य आरोग्य शिक्षण व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर उपस्थित होते. तसेच यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ.हेमंत जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे प्रतिनिधी डॉ.उदय चव्हाण, पाथ महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ.सतीश ताजणे आणि आरोग्य भवनचे सहाय्यक डॉ.जठार यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी तज्ञांनी आरोग्यविषयक उपयुक्त माहिती दिली व दैनंदिन जीवनात निरोगी सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. याशिवाय, त्यांनी आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचे फायदे समजावून सांगितले. कार्यक्रमानंतर आयुष्मान भारत आरोग्य विमा कार्ड काढून घेण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन कोमांडुर,मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे आणि सरव्यवस्थापक आशिष मराठे उपस्थित होते.
शहरे स्वच्छ ठेवण्यास स्वच्छता सेवकांची भूमिका जितकी महत्वाची असते,तितकेच त्यांचे आरोग्य आणि कल्याणही महत्त्वाचे आहे.आरोग्य संवाद सारख्या उपक्रमांमुळे अधिक निरोगी,जागरूक आणि सक्षम स्वच्छता सेवक घडवण्यास मदत होते.
स्वच्छता सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी एपीसीसीआय द्वारे विविध उपक्रम राबविण्यात येतात.यामध्ये कामाला सुरूवात करण्यापूर्वी दररोज व्यायाम सत्रांचे आयोजन,स्वच्छता कार्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणे,नियमित आरोग्य तपासणी व शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी लक्ष केंद्रित करणारे जनजागृती उपक्रम राबवणे यांचा समावेश आहे. एपीसीसीआय शहराची सेवा करताना आपल्या स्वच्छता सेवकांना निरोगी,सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी कटिबध्द आहे.
