स्वच्छ पुणे, हरित पुणे : नागरिकांच्या सहकार्याने शहरात परिवर्तन घडू शकते का?

गेल्या काही दशकांत पुणे शहराचा झपाट्याने विस्तार झाला असून, तुलनेने लहान शहराचे रूपांतर वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या शहरात आहे. वाढती लोकसंख्या, विस्तारत जाणारे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र, वाढती वाहतूक आणि वाढता वापर यामुळे शहरासमोर पर्यावरणाशी संबंधित नवी आव्हानेही निर्माण झाली आहेत. वाढत्या शहरी क्षेत्रात कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची देखभाल, हरित क्षेत्रांचे संरक्षण आणि स्वच्छता राखण्यासाठी केवळ महापालिकेचे प्रयत्न पुरेसे नाहीत. यासाठी नागरिक, समुदाय, विविध संस्था, उद्योग आणि विविध  संघटनांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जेव्हा समान उद्देशाने लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या सामूहिक कृतीतून दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवून आणता येतो, हे पुणेकरांनी वेळोवेळी सिध्द केले आहे.


ही आव्हाने मोठी वाटत असली, तरी पावसाळ्यात कचऱ्याच्या संबंधित समस्येची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवते. रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा तसेच अयोग्य पद्धतीने केलेली कचऱ्याची विल्हेवाट यामुळे सांडपाण्याची निचरा होणारी यंत्रणा तुंबू शकते, पाणी साचण्यास आणि अस्वच्छ परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र, यातील अनेक समस्या आपल्या दैनंदिन वर्तनाशी थेट जोडलेल्या आहेत. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, घरच्या घरी कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, डिस्पोजेबल वस्तूंचा अति वापर करणे आणि कचऱ्याची निष्काळजीपणे विल्हेवाट लावणे या अशा सवयी आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत. त्यामुळे नागरिक हे केवळ स्वच्छ शहराचे लाभार्थी असण्यापलीकडे, या समस्येवरील उपाय योजनेचा केंद्रबिंदू आहेत. हजारो वैयक्तिक वर्तनात बदल घडला, तर परिणामी कुटुंबे आणि समुदायांमध्ये बदल घडून त्याचा शहराच्या स्तरावर व्यापक परिणाम होऊ शकतो.

ही जाणीव सामूहिक कृतीत रूपांतरित करण्यासाठी नागरिकांच्या समूहांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. स्वच्छता मोहिमा, कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती, टेकड्या आणि नद्यांच्या परिसरातील स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण तसेच परिसरातील जनजागृती कार्यक्रमांमधून नागरिकांना आपल्या परिसराची अधिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रेरित करता येते.

अदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) ही संस्था नागरिकांच्या सामुदायिक सहभागाची भावना अधिक दृढ करण्यासाठी कार्यरत आहे. स्वच्छता उपक्रमांमधील सहभाग, स्वयंसेवकांचा सहभाग आणि जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून एपीसीसीआय नागरिकांना अधिक स्वच्छ आणि अधिक शाश्वत पुणे घडविण्यासाठी सक्रिय भागीदार बनण्यास सातत्याने प्रोत्साहित करत आली आहे.

मात्र, नागरिकांच्या समूहांची भूमिका केवळ कचरा उचलण्यापुरती मर्यादित नाही. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे वर्तनातील बदल घडवून आणणे. नागरिकांनी घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण सुरू केले, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी केला, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली आणि इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले, तर स्वच्छता ही एखादी अधूनमधून होणारी मोहीम न राहता समुदायाची दैनंदिन  सवय बनू शकते.

गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट समूह आणि रहिवासी संघटना हे सर्व बदलाचे प्रभावी माध्यम ठरू शकतात. प्रत्येक परिसरातील नागरिक  तेथील पर्यावरणाशी संबंधित आव्हाने ओळखून त्यावर सामूहिकपणे व्यावहारिक उपाययोजना राबवू शकतात. नागरिक सक्रिय सहभागी झाले, तर परिसर अधिक स्वच्छ होतील, समुदाय अधिक सक्षम होतील आणि पुणे अधिक आरोग्यदायी, हरित आणि शाश्वत शहराच्या दिशेने सातत्याने वाटचाल करू शकेल. 

Popular posts from this blog

From Awareness to Action: Building Cleaner Cities Together through collaboration

Volunteering Communities of Pune: MyPrakriti’s Growing Movement for a Cleaner City

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..