ई-कचरा: प्रत्येक भारतीय कुटुंबाने काय जाणून घ्यायला हवे?

घरातील ड्रॉवरमध्ये पडलेला जुना मोबाईल, खराब झालेला चार्जर, वापरात नसलेले इअरफोन किंवा बंद पडलेला लॅपटॉप आपल्याला नेहमीच्या घरगुती कचऱ्यासारखा वाटू शकतो. पण हा साधा कचरा नाही. हा ई-कचरा आहे आणि त्याची विल्हेवाट आपण कशी लावतो, याला मोठे महत्त्व आहे.दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिन साजरा केला जातो. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरानंतर घरगुती कचऱ्यात फेकून देण्याऐवजी त्यांची दुरुस्ती, पुनर्वापर किंवा योग्य पद्धतीने रिसायकलिंग करण्यासाठी नागरिक आणि संस्थांना प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

भारताची अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोबाईल, संगणक, टीव्ही, घरगुती उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण पूर्वीपेक्षा लवकर बदलतो. त्यामुळे देशात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. या कचऱ्यात पुनर्वापर करता येणारे मौल्यवान घटक असतात; मात्र त्याचबरोबर योग्य पद्धतीने हाताळणी न केल्यास पर्यावरणाला हानी पोहोचवू शकणारे घटकही असू शकतात.

पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात ई-कचरा हा कोरड्या कचऱ्याच्या व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा मुद्दा बनत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, चार्जर, हेडफोन, टीव्ही, बॅटरी आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली आहेत. त्यामुळे वापरातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रमाणही वाढत आहे.

ई-कचऱ्याचे वैशिष्ट्य असे की तो दिसायला कोरड्या कचऱ्यासारखा असला तरी त्याची विल्हेवाट सामान्य कागद, प्लास्टिक किंवा धातूच्या कचऱ्याप्रमाणे लावता येत नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये पुनर्प्राप्त करता येणारे घटक असतात, तसेच काही घटक अयोग्य पद्धतीने तोडले किंवा टाकले गेल्यास पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे ई-कचऱ्याची स्वतंत्रपणे हाताळणी आणि योग्य पुनर्वापर प्रक्रिया आवश्यक आहे.

मग घराघरातून काय करता येईल?

सर्वात पहिली आणि सोपी गोष्ट म्हणजे ई-कचरा वेगळा ठेवणे.

जुने मोबाईल, चार्जर, केबल, संगणक, की-बोर्ड, बॅटरी, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ओल्या किंवा नेहमीच्या कोरड्या कचऱ्यात टाकू नयेत. त्या सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी स्वतंत्रपणे साठवून ठेवाव्यात आणि अधिकृत ई-कचरा संकलन केंद्र, पुनर्वापर करणारी अधिकृत संस्था किंवा संबंधित उत्पादकाच्या ‘टेक-बॅक’ सुविधेकडे द्याव्यात.

बॅटरीच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सुट्या बॅटऱ्या घरगुती कचऱ्यात टाकू नयेत. त्यांना तोडणे, चिरडणे किंवा जाळणे टाळावे. फुगलेली किंवा खराब झालेली बॅटरी उष्णतेपासून दूर ठेवावी आणि शक्य तितक्या काळजीपूर्वक अधिकृत संकलन व्यवस्थेकडे द्यावी.

जुना मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणक दुसऱ्याला देण्यापूर्वी त्यातील वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आवश्यक माहितीचा बॅकअप घ्यावा आणि त्यानंतर डिव्हाइसवरील वैयक्तिक डेटा योग्य पद्धतीने हटवावा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-कचरा जाळू नये, स्वतःहून तोडू नये किंवा त्याची प्रक्रिया कशी केली जाणार आहे याची खात्री नसताना अनधिकृत व्यक्ती किंवा व्यवस्थेकडे देऊ नये. ई-कचऱ्याची पुढील प्रक्रिया योग्य पद्धतीने होणे ही त्याच्या व्यवस्थापनातील महत्त्वाची कडी आहे. ई-कचरा इतर प्रकारच्या कचऱ्यात मिसळल्यास त्याच्या पुनर्प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. त्याहून गंभीर बाब म्हणजे, ई-कचरा अनधिकृत,अशिक्षित किंवा असंघटित क्षेत्राकडून हाताळला गेल्यास त्यातील मौल्यवान घटकांचा योग्य पद्धतीने पुनर्वापर होत नाही. मौल्यवान धातू मिळवण्याच्या उद्देशाने ई-कचरा चुकीच्या पद्धतीने तोडला, जाळला किंवा उघड्यावर त्याची विल्हेवाट लावली जाते. यामुळे घातक प्रदूषण वातावरणात मिसळतात आणि त्याचबरोबर पुनर्वापर करता येणाऱ्या इतर उपयुक्त घटकांचाही नाश होतो.

ई-कचऱ्याची जबाबदार विल्हेवाट घरापासूनच सुरू होते. नियम अगदी सोपा आहे,ई-कचरा ओळखा, तो इतर कचऱ्यापासून वेगळा ठेवा आणि योग्य ठिकाणी द्या. ई-कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावल्यास त्यातील पुनर्वापरयोग्य साहित्य आणि मौल्यवान घटक पुन्हा उपयोगात आणता येतात. त्यामुळे नवीन कच्च्या मालाच्या निर्मितीवरील ताण कमी होतो आणि त्यासाठी लागणारा खर्च व नैसर्गिक संसाधनांचा बचाव होतो. अशा प्रकारे ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी आणि शाश्वत विकासाला हातभार लावणारी एक महत्त्वाची राष्ट्रसेवाही आहे.

स्वच्छ आणि अधिक शाश्वत पुणे घडवण्याचा मार्ग केवळ रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यातून जात नाही; आपण घरातून कोणता कचरा कुठे पाठवतो, याची जबाबदारी स्वीकारण्यातूनही तो पुढे जातो.

Popular posts from this blog

Volunteering Communities of Pune: MyPrakriti’s Growing Movement for a Cleaner City

जेव्हा मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरतात..

स्वच्छता सैनिक मेळावा 2025 : समर्पण, संघभावना आणि सामायिक ध्येयाचा उत्सव