पुण्यात राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमा का महत्त्वाच्या आहेत?
पुण्यातील स्वयंसेवक वाढत्या कचऱ्याच्या समस्यांवर उपाय शोधण्यात योगदान देऊ शकतात का? रविवारी सकाळी दिलेले काही तास किती बदल घडवू शकतात? आठवड्याच्या शेवटी राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमांमुळे पुण्यातील कचरा व्यवस्थापनाच्या संबंधित मोठ्या समस्यांचे निराकरण एकट्याने होऊ शकत नाही. मात्र, या मोहिमांचा उद्देशही केवळ तेवढाच नाही. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्यास त्यांना प्रोत्साहित करणे, हे आहे. जबाबदारीने कचरा वर्गीकरण करणे, संकलन, प्रक्रिया आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या मोठ्या उपाययोजनेचा हा एक भाग आहे. मात्र, या व्यवस्था अधिक प्रभावीपणे चालण्यासाठी आवश्यक असलेली जागरूकता निर्माण करण्यात आणि लोकांचा सहभाग मिळवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः कचरा उचलते, तेव्हा कचरा टाकण्याच्या सवयीबद्दल तिचा दृष्टिकोन बदलू लागतो. जेव्हा एक समूह एकत्र येऊन सार्वजनिक जागा स्वच्छ करतो, तेव्हा इतरांनाही त्या जागेचे जतन करण्याची प्रेरणा मिळते.
शाश्वततेच्या दिशेने वाटचाल ही जागरूकता आणि त्यानंतर केली जाणारी कृती इथूनच सुरू होते. सातत्याने केल्या जाणाऱ्या छोट्या कृतींमधून सवयी बदलू शकतात आणि सामाजिक जबाबदारीची अधिक दृढ भावना निर्माण होऊ शकते.पुण्यातील शेकडो नागरिक, विशेषतः तरुण, आपला सुट्टीचा वेळ नदीकाठ, टेकड्या, रस्ते किंवा सार्वजनिक जागांच्या स्वच्छतेसाठी देतात, तेव्हा त्यांचे योगदान केवळ गोळा केलेल्या कचऱ्यापुरते मर्यादित राहत नाही.
पुण्यातील विविध स्वयंसेवी गट आणि तरुण आपल्या सुट्टीच्या दिवसातील सकाळचा वेळ सामाजिक कार्यासाठी देताना दिसत आहेत. नदीकाठ आणि टेकड्यांपासून ते परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक जागांपर्यंत, कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी आणि जबाबदार कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी नागरिक एकत्र येत आहेत. मॅरेथॉनसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांनंतरही स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात. अशा उपक्रमांमधील लोकसहभागामुळे कार्यक्रमांनंतर सार्वजनिक जागा पुन्हा स्वच्छ करण्यास मदत होते.
अदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) पुण्यातील विविध स्वयंसेवी गट आणि संस्थांसोबत काम करताना अशा समुदायाच्या पुढाकारातून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छता उपक्रमांना पाठिंबा देते आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेते. शहरातील, अधिकाधिक नागरिकांना, विशेषतः तरुणांना स्वच्छ आणि शाश्वत शहर घडवण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करणे हे एपीसीसीआयचे उद्दिष्ट आहे.
एपीसीसीआयसोबत स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी leadv@adarpcleancity.com या ई-मेलवर संपर्क साधा.