पुण्याच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार : आपल्या स्वच्छता सैनिकांचा गौरव!
शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ रोजची जबाबदारी नाही, तर ती समाजाप्रती असलेली एक महत्त्वाची सेवा आहे. पुण्याचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज न थकता कार्यरत असतात अनेक हात. ऊन, पाऊस, दिवस असो वा रात्र, कोणत्याही परिस्थितीत आपल्या कामाप्रती निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव जपत शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणारे हे हात म्हणजेच आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह (एपीसीसीआय) चे स्वच्छता सैनिक!

या स्वच्छता सैनिकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी वानवडी येथील महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ६५० स्वच्छता सैनिक , सुपरवायझर्स आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या सहकाऱ्यांच्या कामाचा अभिमानाने गौरव केला.

विशेष म्हणजे, सुमारे ३३ स्वच्छता सैनिकांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. कचरा संकलनादरम्यान सापडलेल्या मौल्यवान वस्तू प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणे असो किंवा सार्वजनिक ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धावून जाणे असो, या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी स्वच्छता सैनिकां च्या योगदानाचे कौतुक केले. तसेच, शहरात स्वच्छतेसाठी किंवा खड्डे बुजविण्यासारख्या कामांसाठी मदतीची आवश्यकता भासल्यास एपीसीसीआयची टीम नेहमीच तत्परतेने प्रतिसाद देते, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. समाजात सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असली, तरी स्वच्छता हीदेखील सुव्यवस्थित, सुरक्षित आणि निरोगी समाजाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
एपीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार करवंदे , सल्लागार कृष्णन कोमंडूर आणि संस्थेच्या ऑपरेशन्स टीमचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

या विशेष उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. स्वच्छतेच्या दैनंदिन जबाबदारी पलीकडे जाऊन प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळख आणि प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कारण, स्वच्छ शहर केवळ स्वच्छतेच्या कामातून घडत नाही, तर ते घडवतात ती माणसे, त्यांची निष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी. पुण्याच्या स्वच्छतेचा खरा आधारस्तंभ असलेल्या आपल्या स्वच्छता सैनिकांना हीच खरी मानवंदना!